संपादक गफ्फार शेख(मलिक)
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
चाळीसगाव(प्रतिनिधी)- चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालयात जळगाव पोलीस यांच्या जनजागृती अभियानांतर्गत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन व जाणीव ट्रस्ट यांच्या माध्यमातून 12 ते 18 वयोगटातील विद्यार्थिनींसाठी NOT ONLY SAVE GIRL, PROTECT THE GIRL या विषयी प्रबोधनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात जाणीव ट्रस्टच्या सदस्य गौरी मीनल कांतीलाल संखे यांनी विद्यार्थिनींना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श तसेच सोशल मीडियाचा योग्य वापर कसा करावा अशा विविध विषयांवर उदाहरणे देऊन सखोल असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक मा.डोळस मॅडम, समन्वयक पोलिस राहुल सोनवणे, मुख्याध्यापक प्रमोद दायमा आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. अतिशय संवेदनशील विषयावर आजचे व्याख्यान होते. अन्याय- अत्याचाराविरुध्द गप्प न राहता त्याविरुद्ध आवाज उठवावा याचे बाळकडू मुलींना या व्याख्यानातून प्राप्त झाले. समाजाला योग्य दिशेने जाण्यासाठी चांगल्या विचारांची पेरणी करणे आवश्यक असून याची सुरुवात शालेय जीवनातून होते, त्यामुळे आपल्या चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन तर्फे आयोजित या उपक्रमाचे कौतुक होत असून शाळेतर्फे किरणकुमार कबाडी साहेब व सर्व आयोजकांचे आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली पाटील व स्वाती गरुड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे सहकार्य लाभले.
