अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- आपल्या कार्याचा पदभार स्वीकारताच ए.पी.आय शंकर मुटेकर यांनी शहरातून सुरू केलेली विद्यार्थी जागृती मोहीम आता तालुक्यात पोहचली आहे,तालुक्यातील हरिभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालय, रांजणगाव येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी दिनांक 8 जुलै रोजी एक विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रमुख ए.पी.आय श्री. शंकर महादेव मुटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सत्रात विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल माहिती देण्यात आली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी तसेच चाळीसगावच्या अॅडिशनल एसपी सौ. कविता नेरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
ए.पी.आय मुटेकर साहेबांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुलांची वैयक्तिक सुरक्षा, वाहतूक नियम, व्यसनमुक्ती, पॉक्सो (POCSO) कायदा, सोशल मीडियाचा वापर आणि गुड टच-बॅड टच यांसारख्या संवेदनशील आणि गरजेच्या मुद्द्यांवर अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले.
स्वतःची काळजी कशी घ्यावी, मुलींनी आपली सुरक्षा कशी करावी, तसेच सोशल मिडियाचा जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने वापर कसा करावा, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडचणीत तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा,” असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
या कार्यक्रमात सुमारे 400 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी श्री. प्रमोद चव्हाण (माजी सरपंच) यांनीही विद्यार्थ्यांना गुटखा, तंबाखू, सिगारेट यांसारख्या व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. एम. बागल, पर्यवेक्षक श्री. व्ही. बी. पाटील, शिक्षक श्री. व्ही. टी. पाटील, तसेच सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, आणि ग्रामीण पोलिस स्टेशनचे श्री. नितीन सोनवणे व श्री. संदीप पाटील यांनी पुढाकार घेतला.
विद्यार्थ्यांच्या मनात सुरक्षा, जबाबदारी, आणि सजगतेचे बीज पेरणारे हे सत्र निश्चितच प्रेरणादायी ठरले.
