अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तीन तालुक्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या गाजत असलेल्या सभासद प्रकरणाची सुनावणी नुकतीच जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पार पडली. या सुनावणीत जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी निकाल राखून ठेवत संस्थेने मागितलेली दोन महिन्यांची मुदतवाढ फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या अंतिम निर्णयाकडे चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात संस्थेवर मोठ्या प्रमाणावर सभासद नोंदणीतील अनियमिततेचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर सर्वपक्षीय कृती समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या माध्यमातून जानेवारी महिन्यात तब्बल २२ हजार १२२ नागरिकांनी प्रत्येकी ५०० रुपयांचे डीडीसह सभासदत्वासाठी अर्ज सादर केले होते. मात्र संस्थेकडून हे अर्ज स्वीकारण्यास नकार देण्यात आल्याने अर्जदारांनी जिल्हा उपनिबंधकांकडे धाव घेतली होती.
दरम्यान, २२ मे रोजी झालेल्या सुनावणीत उपनिबंधकांनी दिलेल्या निर्देशानुसार सुमारे ३५ अपीलार्थींकडून अर्जांच्या छायांकित प्रती संस्थेला सुपूर्द करण्यात आल्या होत्या. तसेच उर्वरित २२ अपीलार्थींना २७ मे रोजी कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी ही प्रक्रिया पूर्ण झाली.
मंगळवारच्या सुनावणीत संस्थेचे वकील अॅड. धीरज पवार यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, २२ हजारांहून अधिक नवीन अर्ज आणि इतर अर्ज मिळून जवळपास २३ हजार अर्जांची छाननी करावी लागणार असून त्यासाठी किमान ६० दिवसांची मुदत आवश्यक आहे. मात्र जिल्हा उपनिबंधकांनी ही मागणी अमान्य करत प्रकरण निकालासाठी राखून ठेवले.
विशेष म्हणजे, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे हे ३१ मे रोजी सेवामुक्त होत असल्याने या प्रकरणाचा निर्णय लवकर जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निकाल काय लागणार याकडे आता तीनही तालुक्यांतील हजारो सभासदांचे लक्ष लागले आहे.
