अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील रामकृष्ण नगरजवळ फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या एका ज्येष्ठ महिलेस पोलीस असल्याचे भासवून तिघा अनोळखी आरोपींनी तब्बल १ लाख ८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने फसवणूक करून लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (२० जुलै) सकाळी घडली.
हे ही वाचा
शोभा सिताराम देवरे (वय ६५, रा. नवलेवाडी, जुने विमानतळ, चाळीसगाव) यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्या सकाळी ६.१५ वाजता दररोजप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. सुमारे ६.४५ वाजता मालेगाव रोडवरील रामकृष्ण नगरच्या पाटीपाशी दोन अनोळखी इसम मोटारसायकलवर येऊन त्यांच्या जवळ आले. त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून पुढे मर्डर झाला आहे असे म्हणत त्यांना एका तिसऱ्या इसमाजवळ नेले.त्या तिसऱ्या आरोपीने गळ्यातील साखळी काढून दिल्यावर, “आमच्या साहेबांनी सांगितले आहे, तुम्हीही तुमचे दागिने काढून द्या,”असे देवरे यांना सांगण्यात आले. विश्वास ठेवून देवरे यांनी अंगावरील सर्व दागिने काढून दिले. यानंतर आरोपींनी एक गाठोडे देऊन “तुमचे दागिने सुरक्षितपणे कागदात बांधले आहेत” असे सांगून साडीच्या पदराला बांधले आणि घटनास्थळावरून पसार झाले. काही वेळाने गाठोडे उघडल्यावर त्यात दगड निघाल्याने फसवणूक झाल्याने देवरे यांनी आरडाओरड केल्यावर नागरिक जमा झाले.
चोरी झालेल्या दागिन्यांमध्ये सोन्याची वेल (१० ग्रॅम): ₹३०,०००,सोन्याचे टॉप्स (५ ग्रॅम): ₹१५,०००,सोन्याचे पोत पेंडलसह (१८ ग्रॅम): ₹५४,०००,सोन्याची अंगठी (३ ग्रॅम): ₹९,००० एकूण अंदाजे किंमत:₹१ लाख ८ हजार रुपये किमतीचे दागिने होते,तिन्ही अनोळखी आरोपी दागिने घेऊन पसार झाले आहेत.त्या आरोपींपैकी एकाने पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट, दुसऱ्याने पांढरा शर्ट व निळी पॅन्ट (हेल्मेटसह), तर तिसऱ्याने फिकट तपकिरी शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेली होती. सर्वजण मध्यम बांध्याचे असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तसेच “त्यांना पाहिल्यावर मी ओळखू शकते.”असे देखील फिर्यादी देवरे यांनी सांगितले आहे.
या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 318(4), 204, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
