अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक पद्धतींचे महत्त्व पटवून देण्यात आले. “स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाहीतर कायमचे आजारपण” या घोषवाक्यासह शाळेने स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश दिला.
शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांच्या हस्ते गणेशाची स्थापना करण्यात आली. मानाच्या पहिल्या दिवसाची आरती शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ तसेच माता-पालक संघटनेच्या सदस्यांच्या हस्ते पार पडली.
शाळेत वृक्षारोपण, शौचालये व कचराकुंड्यांचा योग्य वापर, कापडी पिशव्यांचा प्रसार यावर आधारित घोषवाक्ये लिहिण्यात आली. विद्यार्थ्यांना घरातील गणपतीचे निर्माल्य रोज शाळेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यासाठी शाळेत मोठी डस्टबिन ठेवण्यात आली आहे. विसर्जनानंतर जमा झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत तयार करून ते शाळेच्या परसबागेत वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी दिली.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून गणरायांच्या आगमनाचा उत्साहात जल्लोष केला.
