अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात घडलेल्या कारचोरीच्या प्रकरणाचा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीपणे पर्दाफाश केला असून चोरीस गेलेली चारचाकी कार हस्तगत करण्यात आली आहे.
रामेश्वर कॉलनी येथे वास्तव्यास असलेल्या फिर्यादी यांनी दि. १९/११/२०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्यांची मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर कार घरासमोर पार्क केली होती. मात्र दि. २०/११/२०२५ रोजी सकाळी उठल्यानंतर सदर वाहन गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊनही कार न मिळाल्याने अज्ञात इसमाने वाहनाची चोरी केल्याची खात्री झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ८५७/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचा तपास करत असताना एमआयडीसी पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती संकलित करून तसेच सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. यामधून संशयित आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. त्यानुसार दि. २३/११/२०२५ रोजी जळगाव शहरातील नवनाथ नगर परिसरात सापळा रचून विनय मनोहर जाधव (रा. नवनाथ नगर, जळगाव) या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने सदर कारचोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून चोरी केलेले वाहन छत्रपती संभाजीनगर येथे नेल्याचेही सांगितले.
पोलिसांनी कारवाई करून सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार जप्त केली आहे.
ही विशेष कामगिरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, पोउनि चंद्रकांत धनके, स.फौज. विजयसिंग पाटील, पोह प्रदीप चौधरी, पोह रमेश चौधरी, पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोह गिरीश पाटील, पोकों विशाल कोळी, पोकों नितीन ठाकूर, पोकों किरण पाटील, पोकों शशिकांत मराठे व पोकों नरेंद्र मोरे यांनी बजावली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
