नविन डी.एड/ बी.एड शिक्षकांना नेमणूक द्यावी ,सेवानिवृत्त शिक्षकांना नको-गौतम कांबळे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-नवीन शिक्षक नेमतांना डीएड / बीएड धारकांना संधी द्यावी .सेवानिवृत्त शिक्षकांना नेमणूक देण्यात येऊ नये अशी मागणी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .याविषयी आमच्या प्रतिनिधीशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक ७ जुलै २०२३ चे पत्र मागे घेण्यात यावे .
दिनांक ७ जुलै २०२३ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये सेवानिवृत्त कंत्राटी शिक्षक नेमणूक करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे. परंतू जिल्हा परिषद शाळांमध्ये रीक्त जागेवर सेवानिवृत्त शिक्षक मानधनावर नेमणूक करणे म्हणजे गेले १२ वर्ष नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या डी एड व बी एड पदवी प्राप्त शिक्षकांना आणखी बेरोजगारीत ढकलून अन्याय करणे आहे. त्यामुळे नविन शिक्षकांनाच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी काम करण्याची संधी द्यावी .
महाराष्ट्रात आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत ऑनलाईन पारदर्शक बदली प्रक्रिया पार पडली यामध्ये ४० हजारांहून अधिक शिक्षकांना यातून फायदा झाला . या बदल्यांमध्ये वर्षोनुवर्षे अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो शिक्षकांना स्वतालुक्यात बदलीने जाता आले ही अभिनंदनीय बाब आहे. परंतु यातून अवघड व पेसा क्षेत्रातील कित्येक जागा रिक्त राहिल्या आहेत . या अवघड क्षेत्रातील व पेसा, आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त, वयोवृद्ध शिक्षक काम करू शकणार नाहीत . त्यामुळे येथे नविन शिक्षकांची नेमणूक होणे आवश्यक आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शन सुरू आहे.परंतु महाराष्ट्रातील लाखो डी एड व बी एड पदवी प्राप्त शिक्षक हे बेरोजगार आहेत . त्यांना नोकरी देऊन गुणवत्ता वाढीसाठी या नविन शिक्षकांचा उपयोग होईल व कित्येक नविन बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होतील.
या सर्व कारणांमुळे आपणास विनंती करण्यात येते की , जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर नेमणूक करण्यात येवू नये . गेले बारा वर्ष नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या डी .एड व बी .एड पदवी प्राप्त शिक्षकांची जिल्हा परिषद शाळांमध्ये नेमणूक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .या निवेदनाचा प्रती राज्याचे मुख्य सचिव तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव ,शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांना पाठवण्यात आल्या आहेत . यावेळी राज्य महासचिव विठ्ठल सावंत ,राज्य प्रवक्ते व पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण , हवेली तालुकाध्यक्ष राहुल गायकवाड ,इंदापूर तालुकाध्यक्ष सुहास मोरे व महासचिव शशिकांत मखरे ,दौंड तालुकाध्यक्ष गोविंद जाधव व महासचिव सचिन झुंजार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .