अधिकार आमचा न्युज नेटवर्क
पाचोरा (प्रतिनिधी) –दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११ वाजता पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, माहिजी नाका परिसरात एक इसम विक्रीसाठी तलवारी आणल्याचे समजते. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ कारवाई करत स्मशानभूमी रोड, बाहेरपुरा, पाचोरा येथील सोहेल शेख तय्युब शेख (वय २४ वर्षे) यास ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने कबुली देत सांगितले की, विक्रीसाठी आणलेल्या १८ तलवारी (किंमत अंदाजे ₹५४,०००/-) त्याने एका ठिकाणी लपवून ठेवल्या असून, त्यातील काही तलवारी यापूर्वीच विकल्या असल्याची माहितीही दिली. त्यानंतर सदर तलवारी जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाणे गु. रजि. क्रमांक ४६०/२०२५ प्रमाणे, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक (चाळीसगाव परिमंडळ) सौ. कविता नेरकर, तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरीक्षक कृष्णा घायाळ, कैलास ठाकुर, पोलीस कॉन्स्टेबल संदिप राजपुत , जितेंद्र पाटील व हरीष परदेशी यांनी सहभाग घेतला.
शस्त्रसाठ्यामुळे पाचोरा शहरात खळबळ माजली असून, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस प्रशासनाची ही कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे.
