अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)– श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गोपाळकालाच्या निमित्ताने पर्यावरण पूरक दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अनोख्या उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनींना हंडी फोडण्याचा मान मिळाला.
हंडीत विविध फळांच्या व फुलांच्या बिया कागदी पिशव्यांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. विद्यार्थिनी समृद्धी गव्हाणे हिने हंडी फोडली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या पिशव्या गोळा करून मिळालेल्या बिया रुजवून झाडे लावण्याची प्रतिज्ञा केली. या उपक्रमातून ‘स्त्री-पुरुष समानता’ आणि ‘पर्यावरण संवर्धन’ असा दुहेरी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गोकुळाष्टमीवर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणे केली. शिक्षिका करिश्मा वंजारी व सोनाली चौधरी यांनी विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीचे महत्त्व समजावून सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकवृंदाने या कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी केली. त्यामुळे शाळेत गोपाळकालाचा उत्सव पर्यावरणपूरक व सामाजिक संदेश देणारा ठरला.
