अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
भुसावळ (प्रतिनिधी) – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी भागात मोठी कारवाई करत भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर सुरू असलेल्या ऑनलाईन बेटींग (सट्टा) रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन इसमांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल १,०५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दि. २१ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि. शरद बागल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रकाश हुंदामल सारडा (रा. नवजीवन सोसायटी, सिंधी कॉलनी, भुसावळ) हा आपल्या राहत्या घरी इंडीया विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा चालवित आहे. प्राप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडे सादर करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला असता, सदर ठिकाणी सट्टा खेळवित असलेले दोन्ही इसम पोलिसांच्या ताब्यात आले.
या कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी –
१) प्रकाश हुंदामल सारडा (वय ५५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ)
२) रणजीत चत्रभान हंडी (वय ३५, रा. गणपती नगर, जळगाव)
हे दोघेही आरोपी ऑनलाईन सट्टा लावत असताना पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्या जवळून १,०५,०००/- रुपये किंमतीचा ऑनलाईन सट्ट्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा नोंद क्र. ४५८/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोउपनि. शरद बागल, श्रे. पोउपनि. रवि नरवाडे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोना. विकास सातदिवे, पोकॉ राहुल वानखेडे, प्रशांत परदेशी, मपोकॉ दर्शना पाटील, चा. पोहेकॉ भरत पाटील आदींचा समावेश होता.
या धडक कारवाईमुळे क्रिकेट सामन्यांच्या नावाखाली सुरु असलेल्या अवैध ऑनलाईन सट्टेबाजीला मोठा आळा बसणार असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.
