अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
रामानंद पोलीसांची धडक कारवाई – बांधकाम साहित्य चोरी करणाऱ्या दोन महिला अटकेत
जळगाव (प्रतिनिधी) –महाबळ आणि आदर्श नगर परिसरातील बांधकाम साईटवरून 90 हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरणाऱ्या दोन महिला चोरट्यांना रामानंद पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तब्बल 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
बांधकाम ठेकेदार किरण जगन्नाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 10 जून ते 4 जुलै 2025 या दरम्यान बांधकाम साईटवरून सेंट्रिंग प्लेट्स, लोखंडी जॅक, शिंकज्या असे साहित्य चोरीस गेले होते. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 279/2025, भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, तांबापुर परिसरातील संगीताबाई प्रभाकर चौधरी व हीराबाई दिलीप चव्हाण या दोन महिलांनी चोरी केल्याचे समोर आले. गुन्हे शोधपथकाने कौशल्यपूर्ण तपास करून दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी रात्रीच्या वेळी साईटवरून साहित्य चोरल्याची कबुली दिली.
15 सप्टेंबर रोजी महिलांना अटक करण्यात आली असून, 18 सप्टेंबरपर्यंत न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कस्टडी मिळविण्यात आली. या दरम्यान त्यांच्या ताब्यातून 20 सेंट्रिंग प्लेट्स, किंमत सुमारे 40 हजार रुपये, जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोउपनि सचिन रणशेवरे, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, सुशील चौधरी, जितेंद्र राठोड, विनोद सूर्यवंशी, योगेश बारी, हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, गोविंदा पाटील व अतुल चौधरी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
गुन्ह्याचा पुढील तपास पोना विनोद सूर्यवंशी करीत आहेत.
