अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
“महसुल दुतांची भूमिका अत्यंत महत्त्वाची” – प्रांताधिकारी प्रमोद हिले यांचे प्रतिपादन
चाळीसगाव (प्रतिनिधी) – महसूल विभागाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महसूल दूतांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, नियुक्त युवक-युवतींनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांनी केले.
मा. विभागीय आयुक्त श्री. प्रविण गेडाम यांनी ३० जुलै २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार चाळीसगाव तालुक्यातील १२ महाविद्यालयांमधील २४ युवक-युवतींची “महसूल दूत” म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व महसूल दूतांना चाळीसगाव तहसील कार्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात तहसीलदार प्रशांत पाटील यांनी महसूल विभागाच्या विविध योजना व सेवांबाबत सविस्तर माहिती दिली. यामध्ये ई-पीक पाहणी, ई-हक्क प्रणाली, विविध शासकीय योजना, शेतकऱ्यांसाठीच्या लाभाच्या संधी, तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या प्रक्रियेवर भर देण्यात आला.
प्रशिक्षण कार्यक्रमात निवासी नायब तहसीलदार श्री. प्रथमेश मोहोड आणि महसूल नायब तहसीलदार श्री. संदेश निकुंभ यांचीही उपस्थिती लाभली. प्रशिक्षणाच्या समारोपात सर्व महसूल दूतांना अधिकृत ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.
महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे तालुक्यातील गरजू नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचून अधिकाधिक लाभार्थी सक्षम होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
