अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जामनेर येथे नुकत्याच घडलेल्या कॅफे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीतील कॅफे पडताळणीसाठी विशेष मोहिम सुरू केली. यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकाने गोल्ड जिमसमोरील ‘कॅफे कॉलेज कट्टा’ येथे अचानक छापा टाकला.
जळगाव (प्रतिनिधी) –शहरातील तरुणाईला भुरळ घालणाऱ्या तथाकथित ‘कॅफे कॉलेज कट्टा’च्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील अड्ड्यावर रामानंद नगर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकून मोठा पर्दाफाश केला. कॅफेच्या आडोशाखाली लपवाछपवीत शाळा–कॉलेजमधील मुला–मुलींना अश्लील कृत्ये करण्यासाठी कप्पे उपलब्ध करून दिले जात असल्याचे उघड झाले.
गोल्ड जिमच्या पुढे असलेल्या या कॅफेमध्ये प्लायवुडने केलेले छोटे कप्पे, पडदे लावून मुद्दाम अंधार, आत बसण्यासाठी ठेवलेली सोफे अशी व्यवस्था पाहून पोलिसांनाही धक्का बसला. छाप्यात तब्बल सात जोडपी अश्लील कृत्यांमध्ये गुंतलेली आढळून आली. पोलिसांनी त्यांना तातडीने बाहेर काढून समज देत पालकांना बोलावून खबरदारीचा इशारा दिला.
याहून धक्कादायक बाब म्हणजे या तथाकथित कॉफी शॉपमध्ये कॉफी बनवण्यासाठी लागणारे साहित्यच नव्हते. ना परवाना, ना कॉफी पावडर, ना साखर, ना गॅस! म्हणजेच ‘कॉफी शॉप’च्या नावाखाली प्रत्यक्षात धंदा सुरू होता तो अश्लीलतेचा.
या गंभीर प्रकरणी कॅफे चालक मुकेश वसंत चव्हाण (वय ३०, रा. रोटवद, ता. जामनेर, ह.मु. लाडवंजारी मंगल कार्यालय, जळगाव) याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (अ)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकात पीएसआय सचिन रणशेवरे, हवालदार सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशिल चौधरी, नाईक योगेश बारी, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, अतुल चौधरी, विनोद सूर्यवंशी, महिला पो. शि. स्वाती पाटील आदींनी सहभाग घेतला. पुढील तपास पोह. जितेंद्र राठोड करीत आहेत.
शहरात कॅफेच्या नावाखाली अश्लीलतेचा धंदा फोफावत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. या प्रकारांवर कायमचा आळा घालण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
