अधिकार आमचा न्युज नेटवर्क
धुळे (प्रतिनिधी) – खाद्य तेलाच्या टँकरमध्ये पुष्पा स्टाईलने लपवून नेण्यात येत असलेली विदेशी दारूची मोठी तस्करी धुळ्यात उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, धुळे आणि नरडाणा पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत तब्बल एक कोटी 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. 12 ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली होती की हरियाणातून खाद्यतेलाच्या टँकरच्या आडून गुजरातमध्ये विदेशी दारूची मोठ्या प्रमाणावर तस्करी होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या देखरेखीखाली विशेष पथक तयार करण्यात आले. मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक 3 वर आकांक्षा हॉटेलजवळ नाकाबंदी दरम्यान GJ-12 BV 5015 क्रमांकाचे टाटा कंपनीचे 22 टायरचे टँकर ताब्यात घेण्यात आले.
तपासणीदरम्यान चालक मोहनलाल पुरखाराम जाट (वय 25, रा. बरेवालातला, ता. बाडमेर, राजस्थान) याने टँकरमध्ये खाद्यतेल असल्याचे सांगितले. मात्र, संशय आल्याने पंचासमक्ष टँकरची तपासणी करण्यात आली असता, लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या कप्प्यांमध्ये गॅस कटरने उघडून पाहिले असता विदेशी दारूचा मोठा साठा आढळला.
जप्त मुद्देमाल…
ऑल सीजन रेअर कलेक्शन व्हिस्की (295 बॉक्स, 3540 बाटल्या) – किंमत 42,48,000 रु.
रॉयल चॅलेंज गोल्ड व्हिस्की (70 बॉक्स, 840 बाटल्या) – किंमत 8,98,800 रु.
रॉयल स्टॅग क्लासिक व्हिस्की (35 बॉक्स, 420 बाटल्या) – किंमत 4,49,400 रु.
टाटा कंपनीचा 22 टायर टँकर – किंमत 45,00,000 रु.
एकूण 400 बॉक्समध्ये 3600 लिटर विदेशी दारू आणि टँकर असा 1 कोटी 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी चालक मोहनलाल पुरखाराम जाट याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 कलम 90, 81, 65(अ), 65(ई), 80, 83, 103 सह भारतीय न्याय संहिता कलम 318(2) अन्वये नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विदेशी दारूचा मुळ स्त्रोत आणि तस्करीचे जाळे याबाबतचा तपास सुरु आहे.
सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्रीराम पवार, सपोनि. निलेश मोरे, पोउनि. चेतन मुंडे, पोलीस अंमलदार पवन गवळी, आरिफ पठाण, देवेंद्र ठाकुर, राहुल सानप, मयूर पाटील तसेच नरडाणा पोलीस ठाण्याचे अंमलदार रविंद्र मोराणीस, ललित पाटील, राकेश शिरसाठ, योगेश गीते व मोरे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
