अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – यावल पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे जळगाव शहरातून एक युवक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसेसह अटक करण्यात आला आहे.
दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे यावल पोलीस ठाण्यात दाखल भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१), ३(५) तसेच आर्म अॅक्ट ३/२५ अंतर्गत गुन्ह्याच्या तपासादरम्यान एक आरोपीस सखोल विचारपूस करण्यात आली. त्या दरम्यान त्याने अक्षय अजय जयस्वाल (वय २४, रा. शिवाजी नगर, जळगाव) याला एक देशी बनावटीचे पिस्टल विकले असल्याची माहिती दिली.
या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने शहरात शोधमोहीम राबवून आंबेडकर मार्केट परिसरात अक्षय जयस्वाल हा इम एच -19-बीके-8893 क्रमांकाच्या दुचाकीवर संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने लोखंडी पिस्टल दुचाकीच्या सिटखाली लपवून ठेवल्याची कबुली दिली.
त्यावरुन दुचाकीची झडती घेण्यात आली असता त्यातून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल मॅगझीनसह व पाच जिवंत काडतुसे, अंदाजे किंमत ४०,००० रुपये इतके सापडले. पोलीसांनी सदर लोखंडी पिस्टल जप्त केले असून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही मोहीम पोउनि. शरद बागल, पोहेकॉ अकरम शेख, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, नितीन बाविस्कर, पोना किशोर सोनवणे, पोकॉ सिध्देश्वर डापकर, रविंद्र कापडणे, गोपाल पाटील यांच्या पथकाने यशस्वी केली.
