अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील टाकळी प्र.चा. येथील १६ वर्षीय मुलाचे अपहरण करून चार लाखांची खंडणी मागण्यात आली. मुलाला अमली पदार्थ पाजून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी सुरुवातीला दखल न घेतल्याने शेवटी प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम-१०० अन्वये ‘सर्च वॉरंट’ जारी करून कारवाई केली आणि मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. राज्यात या कायद्याचा अशा प्रकारे पहिलाच वापर झाल्याचा दावा केला जात आहे.
टाकळी प्र.चा. येथील विधवा शेतमजूर शोभाबाई कोळी ऊसतोडणीसाठी जात असतात. दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी मुकादम परभत गायकवाड (रा. हिसवाळ, ता. मालेगाव) व दीपक भगत (रा. बारामती, पुणे) यांनी त्यांच्या घरी जाऊन मुलगा मयूरला कामासाठी घेऊन जाण्याचे सांगून वाहनात बसविले. मात्र तो घरी परतला नाही. सायंकाळी आईला आरोपींकडून फोन आला आणि चार लाख रुपये न दिल्यास मुलाला कर्नाटकमध्ये विकू वा त्याचे हातपाय तोडू अशी धमकी देण्यात आली.
घाबरलेल्या शोभाबाईंनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र सुरुवातीला गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ करण्यात आली. दोन दिवसांनंतरही कारवाई न झाल्याने त्यांनी वकिलांचा सल्ला घेतला. दरम्यान, आरोपींनी मयूरला अमली पदार्थ व दारू जबरदस्तीने पाजून मारहाण केली होती. वैद्यकीय तपासणीत हे स्पष्ट झाले.
नंतर आरोपींनी आपल्या सहकाऱ्यांमार्फत मुलाला बिलाखेड येथे आणून सोडले. शोभाबाई नातेवाईकांसह तेथे पोहोचल्या असता आरोपी पसार होऊ पाहत होते. मात्र हवालदार प्रशांत पाटील, सुनील खैरनार, दत्तू साळवे व अशोक मोरे यांनी धडक कारवाई करून दोघांना पकडले. मुख्य आरोपी परभत गायकवाड व दीपक भगत मात्र फरार झाले आहेत.
दरम्यान, ॲड. प्रेम निकम व रिंकेश गंगेले यांनी या प्रकरणी कलम-१०० अन्वये प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्याकडे अर्ज दाखल केला. हिले यांनी तत्काळ ‘सर्च वॉरंट’ जारी करून चाळीसगाव पोलिसांना आदेश दिले. पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबविण्यात आली आणि अखेर मुलाची सुटका करण्यात यश आले.
“कलम-१०० नुसार मला प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून ‘अटक वॉरंट’ काढले. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई केली. मुलाला परत मिळाल्याचे समाधान आहे. बहुधा राज्यातली ही पहिलीच कारवाई असू शकते.”
– प्रमोद हिले, प्रांताधिकारी, चाळीसगाव
