अधिकार आमचा न्युज नेटवर्क
चोपडा (प्रतिनिधी) – नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम तसेच जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना तसेच ऑल इंडिया ब्ल्यू टायगर सेना जिल्हाध्यक्ष हेमकांत गायकवाड यांनी ई-मेलद्वारे निवेदन सादर केले.
या निवेदनात २८ सप्टेंबर २०२५ रोजी सर्व शासकीय कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. माहिती अधिकार कायदा हा नागरिकांना आपले हक्क जाणून घेण्यासाठी व शासनाच्या कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यामुळे या कायद्याचे महत्व व उपयोगिता शासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे गायकवाड यांनी निवेदनात नमूद केले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर २८ सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनानेदेखील २० सप्टेंबर २००८ रोजीच्या शासन निर्णयानुसार दरवर्षी हा दिवस सर्व शासकीय कार्यालयात साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअंतर्गत व्याख्यानमाला, चर्चासत्र, प्रश्नमंजुषा, निबंध, वकृत्व स्पर्धा, माहिती अधिकार अधिनियमावर आधारित प्रदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या वर्षी २८ सप्टेंबर हा दिवस रविवार तर २७ सप्टेंबर शनिवार असल्याने सुट्टी आहे. त्यामुळे २६ सप्टेंबर किंवा २९ सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या उपक्रमांमध्ये नागरिक, सामाजिक संस्था तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा सहभाग व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
