अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- गणेशोत्सवात विसर्जनानंतर अनेकदा नदीपात्र व धरणांमध्ये अर्धवट बुडालेल्या गणेश मूर्ती तसेच काठावर पडलेल्या मूर्ती आढळून येतात. यामुळे मूर्तींची विटंबना होऊन श्रद्धेचा अपमान तर होतोच, पण पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण होतो. हा प्रकार थांबविण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान, चाळीसगाव यांच्या वतीने ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत स्वच्छता व विसर्जन मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत रांजणगाव व पिंपरखेड शिवारातील लालबर्डी धरण परिसरातून अर्धवट बुडालेल्या व काठावर ठेवलेल्या गणेश मूर्ती जमा करून त्यांचे खोल पाण्यात विधिपूर्वक विसर्जन करण्यात आले. तसेच, विसर्जनावेळी पाण्यात टाकलेल्या प्लास्टिक पिशव्या व कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हे पवित्र कार्य पार पाडले. प्लास्टिकमुळे पाणीस्रोत धोक्यात येत असल्याने ही स्वच्छता मोहीम अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या मोहिमेत सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हा प्रशासक गजानन मोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, जितेंद्र वाघ, नाना चौधरी, भाऊसाहेब पाटील, उमेश खेडकर, संजय पवार सर यांच्यासह अनेक दुर्गसेवक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे मूर्तींचे पावित्र्य राखले गेलेच,तसेच धरण परिसरात स्वच्छतेचा संदेशही दिला गेला.
