अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – कुसुंबा गाव परिसरात गावठी पिस्टलचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्या एका इसमाला एम.आय.डी.सी. पोलिसांनी शिताफीने पकडण्यात यश मिळविले आहे.
दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी रात्री सुमारास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना गुप्त माहिती मिळाली की, कुसुंबा येथील दोस्ती पान सेंटर समोर एक इसम गावठी पिस्टल घेऊन दहशत निर्माण करीत आहे. मिळालेल्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, किरण पाटील, नितीन ठाकुर व राहुल घेटे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिस पाहताच संशयित इसम पळण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अमोल सुरेश खैरनार (वय 28, रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या डाव्या कमरेला गावठी कट्टा (किंमत अंदाजे 10,000 रुपये) लावलेला आढळून आला.
पोलिस शिपाई राहुल घेटे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार, एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गु.र.नं. 622/2025, शस्त्र अधिनियम कलम 3/25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचा पुढील तपास पोहेकॉ रामदास कुंभार करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
