अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) :चारचाकी वाहनातून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका तरुणाची २२,५०० रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन असा ऐवज लुबाडणाऱ्या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. चोरीतील मुद्देमालासह सुमारे ५ लाख रुपये किमतीचे मारुती अर्टिगा वाहनही जप्त करण्यात आले आहे.
घटनेची हकिकत
दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी अजिंठा चौक बसस्थानक येथे धुळे जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना अज्ञात चारचाकी वाहनाने थांबून त्याला लिफ्ट देण्याचा विश्वास संपादन केला. वाहनात इतर प्रवासी असल्याचा बहाणा करून त्याला पुढच्या सीटवर बसवले गेले. काही अंतरावर चोरट्यांनी त्याला जागा नसल्याचे सांगून खाली उतरवले. त्यानंतर त्याच्या खिशातील मोबाईल व रोख रक्कम २२,५०० रुपये चोरीस गेलेले असल्याचे त्याला लक्षात आले.
गुन्हा दाखल
फिर्यादीच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनला गु.र.नं. ६१८/२०२५, भा.न्या.स. २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
कारवाईची माहिती
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. राहुल तायडे, पो.उ.नि. चंद्रकांत धनके,सफौ विजयसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ किरण चौधरी, पोहेकॉ गिरीश पाटील,पोना प्रदीप चौधरी, पोकॉ नरेंद्र मोरे या गुन्हे शोध पथकातील कर्मचारी यांनी सीसीटीव्ही फुटेज व गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन नशिराबाद बाजार परिसरात सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले.
अटक आरोपींची नावे :
1. वसिम अजमल खान (३५, रा. नशिराबाद, जि. जळगाव)
2. जाफर उल्ला कहुल्ला कासार (४२, रा. साथी बाजार, नशिराबाद, जि. जळगाव)
चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून चोरीचा मोबाईल, २२,५००/- रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेले अर्टिगा वाहन जप्त करण्यात आले आहे.
न्यायालयीन प्रक्रिया
आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली. यापूर्वीही त्यांच्या विरोधात विविध गुन्हे नोंद असून तपासादरम्यान आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.
मार्गदर्शन
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पोना प्रदीप चौधरी हे करीत आहेत.
