अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख(मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि. २७ सप्टेंबर गिरणा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून, मालेगाव, देवळा, सटाणा परिसरातही संततधार पावसाची नोंद झाली आहे. चणकापुर, पुनद, हरणबारी, केळझर आणि नागासाख्या या उपप्रकल्पांमधून सुमारे ३५,००० ते ४०,००० क्युसेक्स पाण्याची आवक गिरणा प्रकल्पात होत आहे.
सध्या गिरणा प्रकल्प ९९.२२% क्षमतेने भरलेला असून, १७,३३२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. पाण्याची सतत वाढती आवक लक्षात घेता, विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ किंवा कपात करण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
त्यामुळे नदीकाठावरील गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तसेच पशुधन, शेती साहित्य, मोटार पंप, गुरेढोरे इत्यादींची योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.
