अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
अधिकार आमचा विशेष
पालकांना स्वतःनंतर जर कुणावर विश्वास असतो, तर तो असतो शिक्षकांवर. मुलांना योग्य संस्कार, ज्ञान आणि जीवनमूल्ये देणारा हा समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. “शिक्षक पाल्य घडवतात” ही भावना आजही पालकांच्या मनात दाटून राहते. मात्र, काही शिक्षकांच्या गैरवर्तनामुळे या विश्वासाला तडा जात असल्याची कटू वास्तवता नाकारता येणार नाही.
शिक्षकाकडे विद्यार्थी बापासमान नजरेने पाहतात आणि शिक्षक देखील त्यांच्या बुद्धीचे पोषण शिक्षणातून करत असतात पण जेव्हा एखादा नालायक शिक्षक विद्यार्थिनींकडे विकृत नजरेने पाहतो,विचित्र वागतो, बॅड टच करतो तेव्हा तो केवळ विद्यार्थिनींच्या मनावर जखम करीत नाहीत, तर संपूर्ण शिक्षक समाजावर कलंक लावतो हे मान्य करावे लागेल की असे वर्तन करणारे हे समाजातील खरेखुरे भक्षक आहेत.
ग्रामीण व शहरातील पोलीस प्रशासनाने “गुड टच – बॅड टच” या विषयावर शाळांमध्ये जात जनजागृती सुरू केली व काही गैर प्रकार घडल्यास पोलिस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे,हे निश्चितच कौतुकास्पद आहे.पण आज देखील भीती, इज्जत आणि समाजाची कुचंबणा या भीतीमुळे अनेक तक्रारी दडपल्या जातात. परिणामी या राक्षसी वृत्तीला आणखी खतपाणी मिळते.
यावर उपाय एकच — समाजाने जागरूक होणे.
समाजाने जागृत होत,पीडितांच्या पाठीशी उभे राहणे, त्यांना न्याय मिळवून देणे, हे आपले कर्तव्य आहे. तसेच, प्रामाणिक आणि खर्या अर्थाने आदर्श असलेल्या शिक्षकांनीही पुढाकार घेऊन अशा नालायक सहकाऱ्यांना त्यांच्या लायकीचे स्थान दाखवणे गरजेचे आहे.पण संस्था चालकांनी देखील अश्या राक्षसी प्रवृत्तीच्या विरोधात स्पष्ट भूमिका घेणे तितकेच महत्वाचे आहे.
आज प्रश्न फक्त एवढाच नाही की अशा घटना रोखायच्या कशा? खरा प्रश्न हा आहे की “गुरु-शिष्याचे असणारे पवित्र नाते अश्या घटनांमुळे पवित्र राहील का?”
शिक्षक म्हणजे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि पालकांचा खरा विश्वास. जर हा विश्वास तुटला, तर भविष्यातील पिढ्यांच्या मनात शिक्षकांविषयी आदराचा दीपक कसा तेवत राहील? त्यामुळे या विकृत प्रवृत्तीला समाजाने ठाम विरोध केला पाहिजे.
विद्यार्थिनी सुरक्षित राहिली, तरच शिक्षणसंस्था सुरक्षित राहतील. आणि शिक्षणसंस्था सुरक्षित राहिल्या, तरच भविष्य सुरक्षित राहील.
