अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी) -आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली चाळीसगाव तालुक्याची खरीप आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत खरीप हंगामाच्या तयारी, शेतकऱ्यांच्या समस्या आणि शासनाच्या योजना यावर चर्चा करण्यात आली.अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे निर्देश देण्यात आले तसेच खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याचे आश्वासन दिले. या बैठकीमुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
चाळीसगाव तालुक्याच्या खरीप आढावा बैठकीत खत आणि बियाणे यांच्या पुरवठ्यावर देखील सविस्तर चर्चा झाली. उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खतांचा आणि बियाणांचा तालुक्यात पुरेसा पुरवठा आहे की नाही, याची माहिती घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले की शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दरात गुणवत्तापूर्ण खते आणि बियाणे उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते आणि बियाणे वेळेवर मिळणार आहेत. तसेच तहसीलदार प्रशांत पाटील यांनी आत्ताच झालेल्या अवकाळी पावसाच्या संदर्भात व्यवस्थित पंचनामे करण्याचे आदेश दिले.आगामी खरीप हंगामासाठी चाळीसगाव कृषि विभाग पूर्णपणे सज्ज असल्याचे तालुका कृषि अधिकारी अभिषेक लगड यांनी सांगितले.या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रमोद हिले,तहसीलदार प्रशांत पाटील,तालुका कृषि अधिकारी अभिषेक लगड ,उपविभागीय अभियंता पाटबंधारे विजय पवार, कृषि निविष्ठा विक्रेते प्रतिनिधी,प्रगतशील शेतकरी,तसेच महसूल व कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
