अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – वडिलोपार्जित शेतजमिनीवरील कालबाह्य नोंद कमी करण्याच्या कामासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या तलाठीसह तिघांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे युनिटने कारवाई करत रंगेहाथ पकडले आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला नवे पोलीस निरीक्षक मिळाले : शशिकांत पाटील यांची नियुक्ती
तक्रारदार (वय ३५) यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या मौजे पाथरजे, ता. चाळीसगाव येथील शेतीच्या ७/१२ उताऱ्यावरील कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी तहसील कार्यालय, चाळीसगाव येथे अर्ज केला होता. या कामासाठी आरोपी तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहीम (वय २९) यांनी रोजगार सेवक वडिलाल रोहिदास पवार (वय ४०) यांच्या मार्फत २५,००० रुपये लाचेची मागणी केली होती. या व्यवहारात दादा बाबू जाधव (वय ४०) या तिसऱ्या व्यक्तीने तक्रारदारास लाच देण्यास प्रोत्साहन दिले.
तक्रारदाराने ३ जुलै २०२५ रोजी या लाचेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १४ व १७ जुलै रोजी तपासणीदरम्यान आरोपींकडून लाचेची स्पष्ट मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर ३० जुलै रोजी चाळीसगाव येथे सापळा रचण्यात आला. या सापळ्यात दुपारी आरोपी वडिलाल पवार यांनी तलाठी दिलशाद मोमीन यांच्या वतीने तक्रारदाराकडून २५,००० रुपये घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईत तिन्ही आरोपींच्या विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडील तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
ही सापळा कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक श्री. सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात पो.नि. पद्मावती कलाल, पो.हवा. राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, पो.कॉ. रामदास बारेला, मकरंद पाटील व चालक पो.कॉ. जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली
नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक: 02562-234020
टोल फ्री क्रमांक: 1064
