अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव रोडवरील बालाजी पेठ परिसरात झालेल्या सोन्याच्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणत शनिपेठ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीस अटक करून चोरी गेलेले सर्व सोने हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
घटनेत असे समोर आले की, दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ३.३० ते ४.१२ वाजेच्या सुमारास बालाजी पेठ येथील निखिल कैलास गौड (वय ३०, व्यवसाय सोने कारागीर) यांच्या लक्ष्मीनारायण ज्वेलर्स या दुकानाचे कुलूप तोडून एक इसम आत शिरला. त्याने कारागीर सुदर्शन माल यांच्या कामासाठी ठेवलेल्या लाकडी ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यातील १२४ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा र.नं. २२७/२०२५ भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरी करणारा इसम बिस्वजीत बनेस्वर सासमल (रा. वार्ड क्र. १०, जयनगर, पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात त्याने हैद्राबाद येथे जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट बुक केल्याचे आढळले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दि. ४ ऑक्टोबर रोजी हैद्राबाद येथे आरोपीस ताब्यात घेतले.
अटक केल्यानंतर चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला –
१२४.०६ ग्रॅम वजनाचे ₹१३,९९,०००/- किंमतीचे सोने
१८ इंच लांबीची कात्री (कटावणी)
लोखंडी पक्कड (पेन्विस)
एक्झाब्लेड – चोरीसाठी वापरलेली साधने
आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास दि. ७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपासादरम्यान चोरीतील इतर बाबींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. श्रीमती कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वात API साजिद मंसुरी, PSI योगेश ढिकले, पोहेकॉ अल्ताफ पठाण, प्रदीप नन्नावरे, योगेश जाधव, योगेश साबळे, निलेश घुगे, अमोल वंजारी, नवजीत चौधरी तसेच तांत्रिक विश्लेषण विभागातील पोकॉ गौरव पाटील यांनी केली.
पोलिसांच्या दक्ष तपासामुळे चोरी झालेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून स्थानिक व्यापारी व नागरिकांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक केले आहे.
