अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)-दि. ०६ सप्टेंबर :प्रदूषण हा आजच्या जगासमोरील गंभीर प्रश्न असून पर्यावरण संवर्धनासाठी प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेमार्फत यंदाही “गणपती विसर्जना ऐवजी दान करा” हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे.
गणेश विसर्जनामुळे तलाव व नदीपात्रामध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने नागरिकांना गणेशमूर्ती विसर्जनाऐवजी दान करण्याचे आवाहन केले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्थापन केलेल्या संकलन केंद्रांवर मूर्ती संकलित करून त्या गावातील किंवा रस्त्यावर राहणाऱ्या इच्छुक भाविकांना पूजनासाठी दान केल्या जाणार आहेत.
या उपक्रमाला प्रोत्साहन म्हणून मा. नगरसेवक प्रशांतभाऊ नाईक यांनी स्वतःच्या घरातील गणपतीची मूर्ती महापालिकेला दान केली. या वेळी बोलताना ते म्हणाले, “प्रदूषण हा जगासमोरील मोठा प्रश्न आहे. त्याविरोधात लढण्यासाठी आपण लहानसा का होईना पण हातभार लावला पाहिजे. त्याच उद्देशाने आम्ही गणपतीची मूर्ती विसर्जनाऐवजी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.”
नगरसेवक नाईक यांनी प्रभागातील सर्व नागरिकांना या अभिनव उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण संरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
