अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी शहरात रस्तोरस्ती मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा त्रास नागरिकांना पुन्हा सहन करावा लागत आहे. काही काळापूर्वी मोकाट जनावरांना पकडण्यासाठी आणि त्यांच्या वाहतुकीसाठी नगरपालिका प्रशासनाने टेंडर प्रक्रिया राबवली टेंडर दिले होते आणि मोकाट जनावरांना पकडून ज्यांच्या मालकीची आहे त्यांना दंड देत कारवाई देखील सुरू केली होती मात्र सद्यस्थितीत ही कारवाई थंडावल्याचे चित्र असून, शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर मोकाट जनावरे पुन्हा दिसू लागली आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यांपासून बाजारपेठेपर्यंत या जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघातांचाही धोका वाढला आहे. काही ठिकाणी शाळेच्या परिसरातही ही जनावरे फिरताना दिसून येत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
नागरिकांतून प्रश्न उपस्थित केला जात आहे की, प्रशासनाने टेंडर काढून देखील मोकाट जनावरांवर कारवाई का थांबवली? यामागे कोणते कारण आहे? नगरपालिकेने यावर तत्काळ कारवाई सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
नगरपालिका प्रशासनाने यासंबंधी स्पष्ट भूमिका घेऊन मोकाट जनावरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढावा असे देखील सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.
