अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनतर्फे समाजात अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि.18 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9.30 ते 12.00 वाजेपर्यंत वाघळी येथील शेठ कुंदनमल इंदरचंद राका माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.
“अंमली पदार्थ सेवणाचे दुष्परिणाम” या विषयावर झालेल्या निबंध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांमधून समाजातील व्यसनाधीनतेचे परिणाम स्पष्ट केले आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगितले. त्याचबरोबर “गुड टच – बॅड टच” यासारख्या संवेदनशील विषयांवरही विद्यार्थ्यांना जागरूक केले. भविष्यातील पिढी व्यसनमुक्त राहावी यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःसोबतच समाजालाही सजग करण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर उपक्रमाला पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोलिस हवालदार विजय शिंदे, प्रवीण सपकाळे, पो.कॉ. कांगणे, राहुल महाजन उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच जवळपास 400 विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थांपासून दूर राहण्याची जाणीव निर्माण करून समाजात व्यसनमुक्तीबाबत सकारात्मक संदेश पोहचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.
