अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव (प्रतिनिधी) – शनिपेठ पोलीस स्टेशनने अलीकडील काळात केलेल्या सलग कारवायांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांना चांगलाच धडा शिकवला आहे. चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करून आरोपीला अटक, हद्दपारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आरोपीस गजाआड करणे तसेच बेवारस वाहन शोधून मालकाकडे सुपूर्द करणे अशा तिहेरी कामगिरीने शनिपेठ पोलीस स्टेशनचे नाव पुन्हा एकदा गाजवले आहे.
मोटारसायकल चोरी प्रकरणाचा छडा
दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी बजाज पल्सर N160 मोटारसायकल चोरीचा गुन्हा शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास पोनिसो श्रीमती कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों/प्रदीप नन्नवरे, पोहेकों/शशिकांत पाटील तसेच पोलीस अंमलदार निलेश घुगे, रविंद्र तायडे, पराग दुसाणे, अमोल वंजारी व गणेश ढाकणे यांनी केला.
तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी हा भुसावळ शहरातील पापानगर, इराणी मोहल्ला येथे वास्तव्यास असल्याचे समोर आले. बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ व त्यांचा गुन्हे अन्वेषण पथकाच्या सहकार्याने छापा टाकण्यात आला. अखेर आरोपीला अटक करून चोरीस गेलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली.
हद्दपारी आदेशाचे उल्लंघन – आरोपी ताब्यात
गुन्हेगारी प्रवृत्तीचा आरोपी सागर उर्फ झंपऱ्या आनंदा सपकाळे (वय-32, रा. कोळीपेठ, जळगाव) याला मा. पोलीस अधीक्षकांनी कायद्यानुसार जिल्ह्यातून हद्दपार केले होते. मात्र 23 ऑगस्ट रोजी तो आपल्या राहत्या घरी वास्तव्य करत असल्याची खात्रीलायक माहिती पोलीसांना मिळाली.
पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल वंजारी, पराग दुसाणे, निलेश घुगे व काजोल सोनवणे यांच्या पथकाने छापा टाकून सपकाळे यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेवारस वाहनाचा शोध आणि सुपुर्दगी
जून महिन्यात शनिपेठ हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान पोलीस अंमलदार रविंद्र साबळे व निलेश घुगे यांच्या सतर्कतेमुळे बेवारस स्थितीत हिरो स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. MH-19 BS-6662) आढळून आली.
पोनिसो कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकों प्रमोद पाटील यांनी उपप्रादेशिक परिवहन विभाग तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या सहकार्याने वाहन मालकाचा शोध घेतला. चौकशीत सदर मोटारसायकल भुसावळ येथून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. यानंतर योग्य कागदपत्रांची पडताळणी करून वाहन त्याच्या खऱ्या मालकाकडे सुपूर्द करण्यात आले.
नागरिकांचा विश्वास अधिक बळकट
शनिपेठ पोलीस स्टेशनच्या या सलग व यशस्वी कारवायांमुळे केवळ गुन्हेगारीवर आळा बसला नसून नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वासही अधिक दृढ झाला आहे.
