अधिकार आमचा न्युज नेटवर्क
जळगाव प्रतिनिधी शाहिद खान
जळगाव(प्रतिनिधी)- श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त सामूहिक पसायदान पठण आयोजित करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानाच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना केली होती. त्याच प्रेरणेने शाळेतील विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी एकत्रितपणे या विश्वप्रार्थनेत सहभाग घेतला.
कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वेशात अवतरलेल्या मीत संदीप चौधरी यांची शिक्षकांनी मनोभावे पूजा करून सत्कार केला. पसायदान पठण उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी केले.
मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले की, “या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक व आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करणे, त्यांना ज्ञानेश्वरी आणि पसायदान यांची ओळख करून देणे व चांगल्या मूल्यांवर आधारित जीवन जगण्यास प्रवृत्त करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”
दरम्यान, ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त रामेश्वर कॉलनी व मेहरून गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी सोहळ्याला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
