अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी) – यंदाचे वर्ष २०२५ हे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी (७५० वर्ष) जयंतीचे औचित्य लाभलेले आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार १४ ऑगस्ट हा दिवस राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘पसायदान’ दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर चाळीसगाव येथील राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कळमडू येथील कलाशिक्षक घनश्याम बोरसे यांनी आपल्या अप्रतिम कलावैभवातून शाळेच्या फलकावर रंगीत खडूंनी संत ज्ञानेश्वर माऊलींची विलोभनीय प्रतिमा रेखाटली आहे. या कलाकृतीतील सूक्ष्म तपशील, भावमुद्रा आणि रंगसंगती पाहून विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या नजरा या कलाकृतीवर खिळून राहतात, तर अनेकांनी या चित्रासमोर थांबून संत माऊलींना वंदन केले. कलाशिक्षक बोरसे यांची ही कलाकृती केवळ सौंदर्याचा नमुना नसून अध्यात्मिक भावनांनाही साद घालणारी ठरली आहे.
