अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
सफाईच्या बहाण्याने ४५ लाखांची रोकड साफ करणाऱ्या संशयितांवर,सी सी टी व्हि फुटेज वरून गुन्हा दाखल..
चाळीसगाव(प्रतिनिधी): शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या सुपरिअल्टी बिल्टकॉन एलएलपी मुंबई या कंपनीच्या कार्यालयात तब्बल ₹४५,१६,३००/- किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी माजी कर्मचारी साईनाथ पंढरीनाथ चौधरी याच्यावर संशय व्यक्त करत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी राजेंद्रसिंग रामसिंग पाटील (वय ६५, रा. जयकिसान कॉलनी, पाचोरा) हे सुपरिअल्टी बिल्टकॉन एलएलपी मुंबई या कंपनीत शिवनेरी पार्क या गृहनिर्माण प्रकल्पाचे संचालक आहेत. सदर कार्यालयातून दैनंदिन आर्थिक व्यवहार तसेच बांधकामाशी संबंधित कामकाज चालते.
कंपनीच्या कार्यालयात ३० ऑगस्ट रोजी सुमारे ₹४५ लाख रोख रक्कम, कंत्राटदारांनी जमा केलेली ठेव, तसेच दैनंदिन खर्चासाठीची रक्कम ठेवण्यात आली होती. अकाऊंटन्ट गौरव शिरुडे रजेवर असल्याने, ही रक्कम दीपक पाटील यांच्याकडे सुरक्षित ठेवली होती.
मात्र, २ सप्टेंबर रोजी दुपारी कार्यालय उघडले असता कपाट उघडे असल्याचे व रोख रक्कम, हार्डडिस्क (किंमत ₹१६,०००) व पेनड्राईव्ह (किंमत ₹३००) असा एकूण ₹४५,१६,३००/- किमतीचा ऐवज गायब झाल्याचे निदर्शनास आले.
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सकाळी साडेसातच्या सुमारास साईनाथ पंढरीनाथ चौधरी (रा. मराठा मंगल कार्यालय, चाळीसगाव) हा व्यक्ती वॉचमनकडून खोट्या सबबीखाली चावी घेऊन कार्यालयात शिरल्याचे दिसून आले. त्याने साफसफाईच्या बहाण्याने कपाटातून पिशवीत ठेवलेले पैसे उचलून नेल्याचे रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट झाले.
याबाबत चौकशी केली असता, तो याआधी कंपनीत कामाला होता मात्र नंतर त्याला कमी करण्यात आले होते. सफाई ठेकेदार राहुल नकवाल यांनीदेखील त्याची ओळख पटवली असून, त्याला कामासाठी स्वतः पाठविले नसल्याचे सांगितले.
या प्रकरणी फिर्यादी पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०५ व ३१९ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध सुरु असून शहर पोलिस पुढील तपास करीत आहे.
