अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)– शहर व तालुक्यातील वीज ग्राहकांकडे विद्यमान मीटर व्यवस्थित असतानाही वीज वितरण कंपनीच्या वतीने जबरदस्तीने नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. हे स्मार्ट मीटर वेगाने फिरत असल्याने ग्राहकांना दरमहा १ ते ३ हजार रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड बसतो, असा आरोप रयत सेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी रयत सेनेच्या वतीने सहा. अभियंता सुनील कांदे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,
जुने मीटर खराब नसतानाही स्मार्ट मीटर बसवले जात आहेत.
दोन वर्षांपूर्वी रेडिओ फ्रिक्वेन्सी मीटर बसवल्यानंतर आता पुन्हा स्मार्ट मीटर बसवून ग्राहकांची आर्थिक लूट सुरू आहे.
स्मार्ट मीटरमुळे जास्त वाचन दाखवले जात असून महाराष्ट्रभरातून याला विरोध सुरू आहे.
गरीब व दुर्बल घटकांना अतिरिक्त बिले परवडणारी नाहीत, त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घ्यावा.
रयत सेनेचा इशारा
स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तात्काळ बंद न केल्यास हिरापूर रोड येथील वीज वितरण कंपनी कार्यालयावर मोठे जनआंदोलन उभारले जाईल. त्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी कंपनीची राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती आमदार, प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार यांना पाठविण्यात आल्या आहेत.
निवेदनावर रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब गरुड, प्रदेश सचिव प्रमोद वाघ, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, तालुका अध्यक्ष संजय हिरेकर, शहर अध्यक्ष प्रदीप मराठे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
