अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणाऱ्या १२ गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याच्या आनंदात सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावतर्फे मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवात मल्हारगडावर भंडारा उधळून जल्लोष करण्यात आला, तर चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा पेढे भरवून, शाल, श्रीफळ, व पुष्पहार देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले गड किल्ले म्हणजे राजगड, रायगड, शिवनेरी, प्रतापगड, खांदेरी, साल्हेर, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, लोहगड, पन्हाळगड, सुवर्णदुर्ग आणि जिंजी. या समावेशामुळे या किल्ल्यांचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन आणि जागतिक पातळीवर ओळख होण्यास मदत होणार आहे. ही बाब दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद असल्याचे सह्याद्री प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य शासनाने यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानण्यात आले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, “गडकिल्ल्यांचे संवर्धन हे केवळ इतिहासाचे नव्हे, तर भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल. खानदेशातील दुर्गांच्या जपणुकीसाठी जी मदत लागेल ती मी निःसंशय करीन.”
या कार्यक्रमाला सह्याद्री प्रतिष्ठानचे केंद्रीय उपाध्यक्ष दिलीप घोरपडे, जिल्हाध्यक्ष अॅड. रणजीत पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन पाटील, तालुका अध्यक्ष गणेश (पप्पू) पाटील, तालुका संपर्कप्रमुख योगेश शेळके, शहर प्रमुख सचिन पैलवान पाटील, ज्ञानेश्वर (नाना) चौधरी, राजूभाऊ मांडे, संजय पवार सर, ललित चौधरी, बबलू चव्हाण, दर्शन चौधरी, ललित अशोक चौधरी, रणजीत अहिरे, शेखर आगोणे, सागर रोझेकर, मयूर भागवत, नृतेश भागवत, मुकुल भागवत, उमेश खेडकर, सागर आगोणे, संदीप वराडे आदींची उपस्थिती होती.
हा ऐतिहासिक निर्णय आणि आनंदोत्सव गडकिल्ल्यांच्या संवर्धन चळवळीसाठी नवा अध्याय ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
