अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) –दिनांक 12 जुलै रोजी शहर वाहतूक शाखा, चाळीसगाव येथे शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत वाहनधारकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसंदर्भात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
मोटार वाहन कायद्याचे काटेकोर पालन, विद्यार्थ्यांची वाहनांमध्ये सुरक्षित बसण्याची सोय, वाहनांची नियमित तपासणी आणि अपघात टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.त्यांनी सर्व वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
यावेळी दोन वाहन चालक — ज्यांचे अलिकडे आजारपणामुळे निधन झाले होते — त्यांच्या कुटुंबीयांना सहकारी असलेल्या वाहनधारकांच्या वतीने प्रत्येकी 21 हजार रुपयांची आर्थिक मदत वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक एकशिंगे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या सह कर्मचारी,विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे सर्व वाहनधारक मोठ्या संख्येने या बैठकीत सहभागी झाले होते.
