अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव प्रतिनिधी
ग्लोबल बंजारा अस्तित्व फाउंडेशनतर्फे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांनी ५ डिसेंबर १९६३ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून ‘बंजारा गौरव दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम दिनांक ५ डिसेंबर रोजी संस्कार गुरुकुल पब्लिक स्कूल, शिंदी येथे अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक राठोड उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “नाईक साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताना सोळा सूत्री विकास योजनांचे यशस्वी नेतृत्व केले. त्यांच्या कृषी-सुधारक धोरणांमुळे महाराष्ट्रात हरित क्रांतीची मजबूत पायाभरणी झाली.”
संस्थेच्या उपाध्यक्ष आरती महाले यांनी नाईक साहेबांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले, “मुख्यमंत्री असताना वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत सक्षम व स्वयंपूर्ण केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून हायब्रीड बियाण्यांचा प्रसार करण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल त्यांनी उचलले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कृषी क्षेत्रात अभूतपूर्व बदल घडून आले.”
कार्यक्रमास कीर्ती देशमुख, उज्वला कोठारे, श्रीराम राठोड, प्रकाश राठोड, चव्हाण, पल्लवी जाधव, ओंकार जाधव, विशाल चव्हाण, अनिल चव्हाण यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोप प्रसंगी स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यांच्या विचारांपासून आणि कार्यातून प्रेरणा घेऊन समाज व राष्ट्रहितासाठी काम करण्याचे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.
