जळगाव(प्रतिनिधी)- आगामी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर जळगाव जिल्हा पोलिसांनी यंदा अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. नायलॉन किंवा सिंथेटिक मांजा विकणाऱ्या अथवा वापरणाऱ्या व्यक्तींवर यापुढे केवळ जप्तीची कारवाई न करता, थेट भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ११० अंतर्गत ‘सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न’ हा गंभीर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.
नवीन कायद्यानुसार कठोर कारवाई का?
नायलॉन मांजा हा मानवी जीवनास तसेच पशु-पक्ष्यांसाठी अत्यंत घातक आहे. यामुळे गळा चिरला जाऊन दुचाकीस्वार, पादचारी तसेच पक्ष्यांचे बळी गेल्याच्या अनेक दुर्दैवी घटना राज्यभर घडल्या आहेत.नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्यांना या मांजामुळे जीवितहानी होण्याची पूर्ण जाणीव असते. तरीही केवळ आर्थिक फायद्यासाठी विक्री केल्यास, हे कृत्य BNS 2023 अंतर्गत ‘Attempt to Culpable Homicide’ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) या गुन्ह्याच्या व्याख्येत येते. हा गुन्हा अजामीनपात्र (Non-Bailable) असून, १० वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
पोलीस प्रशासनाची विशेष मोहीम
नायलॉन मांजाविरोधात संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार असून त्यात पुढील बाबींचा समावेश आहे —१) साध्या वेशातील पथके :प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत विशेष पथके (Special Squads) तैनात करण्यात आली असून, ही पथके ग्राहक बनून दुकानांमध्ये तपासणी करणार आहेत.२) गोदामे व घरांवर छापे :दुकानांसोबतच घरांमध्ये किंवा गोदामांमध्ये लपवून ठेवलेल्या नायलॉन मांजाच्या साठ्यावरही धाडसत्र राबविले जाईल.३) विक्रेत्यांना नोटिसा :जिल्ह्यातील सर्व पतंग व मांजा विक्रेत्यांना BNS तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार कलम १४९ (BNSS 168) अंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी व पालकांनी आपल्या मुलांना नायलॉन मांजा खरेदी करून देऊ नये. नायलॉन मांजा तुटत नसल्यामुळे दुचाकीस्वारांच्या गळ्याभोवती अडकून गंभीर अपघात होतात. तसेच हा मांजा विजेच्या तारांवर अडकल्यास शॉर्ट सर्किट होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात.
तक्रार कोठे करावी?
आपल्या परिसरात कोणीही नायलॉन मांजाची विक्री करत असल्याचे आढळल्यास, नागरिकांनी तात्काळ ११२ हेल्पलाईनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लागू होणारी कायदेशीर कलमे
नायलॉन मांजा विक्री वा वापर प्रकरणात आरोपींवर पुढील कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत BNS कलम ११० – सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, BNS कलम २२३ – जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन,पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ व १५ – ५ वर्षांपर्यंत कारावास व १ लाख रुपये दंड
