अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरात शासनाने प्रतिबंध घातलेल्या गुटख्याची खुलेआम व सर्रास विक्री सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. कायद्याने बंदी असतानाही शहरातील विविध भागांमध्ये गुटख्याचा काळाबाजार जोमात सुरू असून याकडे अन्न व औषध प्रशासन,पोलीस विभागासह संबंधित यंत्रणांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
शहरात “वातावरण टाईट आहे” असे सांगत १० रुपयांचा गुटख्याचा पाऊच तब्बल १५ रुपयांना विकला जात असल्याची चर्चा आहे. मागणी अधिक आणि कारवाईचा धाक नसल्यामुळे विक्रेत्यांची मनमानी सुरू असून शहरात फक्त नावाला गुटखा बंद आहे. नेमकं गुटखा शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात कसा आणि कुठून येत आहे याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे शहरातील छोट्या-मोठ्या पानटपऱ्या, किराणा दुकाने याठिकाणी प्रतिबंधित गुटख्याचा साठा सहज उपलब्ध असल्याचे दिसून येते. कोणतीही भीती न बाळगता हा अवैध व्यवसाय सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
गुटख्यामुळे होणारे गंभीर आरोग्यविषयक परिणाम लक्षात घेता शासनाने यावर कडक बंदी घातली आहे. मात्र प्रत्यक्षात शहरात सुरू असलेली ही सर्रास विक्री व यामागे असलेले पुरवठादार यांचा शोध घेत तातडीने ठोस कारवाई होणार का,असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. संबंधित विभागांनी केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्षात धडक कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
