अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-: जीवनाच्या अखेरच्या प्रवासाला निरोप देताना कुटुंबीयांना शांततेची अपेक्षा असते. मात्र खरजई रोडवरील अमरधाम (स्मशानभूमी) येथे मूलभूत सुविधांच्या अभावामुळे दुःखाच्या क्षणीही नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
अमरधाम परिसरात बसविण्यात आलेले नळ केवळ शोपीस ठरत असल्याचे चित्र आहे. बहुतांश नळ बंद अवस्थेत असून पाण्याची सोय नसल्याने उपस्थितांना एकाच टाकीतून पाणी घ्यावे लागते. अंत्यसंस्काराच्या वेळी पाण्याची गरज अत्यावश्यक असते; मात्र अशी गैरसोय होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
इतकी सुंदर आणि सुबक उभारणी असलेल्या स्मशानभूमीचे योग्य मेंटेनन्स संबंधित विभागाकडून होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.यासोबतच पार्किंगची सोय नसल्याने अंतिम यात्रेला आलेल्या नातेवाईक, मित्रपरिवार व पाहुण्यांना वाहने रस्त्याच्या कडेला किंवा जवळील चरण पेट्रोल पंप परिसरात उभी करावी लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत असते यामुळे शोकाकुल वातावरणातही गोंधळाचे चित्र दिसते.
नागरिकांच्या मते, अमरधामच्या मुख्य गेटच्या बाहेरील लाकडांची योग्य व्यवस्था केल्यास त्या जागेत मोठ्या प्रमाणात पार्किंगची सुविधा उपलब्ध होऊ शकते. यासाठी प्रशासनाने तातडीने नियोजन करून पाणीपुरवठा सुरळीत करणे, नळ कार्यान्वित करणे व पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.अंतिम निरोपाच्या वेळी कुटुंबीयांना केवळ आपल्या आठवणींमध्ये रमण्याची संधी मिळावी, अडचणींशी झुंज द्यावी लागू नये—हीच नागरिकांची प्रशासनाकडे भावनिक अपेक्षा आहे.
