अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील बर्डी शिवारात एका विहिरीत बिबट्याच्या सुमारे चार महिन्यांच्या पिल्लाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना दिनांक १५ जानेवारी रविवारी रोजी सायंकाळी उघडकीस आली. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून वनविभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बर्डी शिवारातील सावता महाजन यांच्या गट क्रमांक १२२८ मधील विहिरीत काही शेतकऱ्यांना बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत तरंगताना दिसले. त्यांनी तत्काळ याबाबत वनविभागाला माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून चाळीसगाव वन परिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
वनकर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने मृत बिबट्याच्या पिल्लाला विहिरीतून बाहेर काढले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप भट यांनी घटनास्थळीच मृत पिल्लाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर वनविभागाच्या उपस्थितीत मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी वन परिक्षेत्र अधिकारी कोमल पिंडुरकर, वनपाल चंद्रकांत पाटील, वनरक्षक नितीन काळे आदी कर्मचारी उपस्थित होते.
