Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील जुनोने शिवारात अवैध गावठी हातभट्टीच्या दारू निर्मितीवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन नष्ट केले. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच संबंधित आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलीस नाईक भगवान फकिरा माळी (वय ३७, नेमणूक – चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. ते गेल्या पाच वर्षांपासून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असून गणेशपूर दुर्गक्षेत्राचा कारभार पाहत आहेत.
दि. २६ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत, पोहेकॉ. प्रविण संगेले व अकरम बेग यांच्यासह पथक अवैध धंद्यांवर कारवाईसाठी सज्ज होते. त्यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जुनोने शिवारातील धरणालगत पांडू रामराव सोनवणे यांच्या शेताजवळ अर्जुन लक्ष्मण पवार हा इसम गावठी दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन भिजत ठेवत असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पंचांसह पोलिसांनी सकाळी सुमारे ८.२० वाजता घटनास्थळी छापा टाकला. धरणाच्या खोलगट भागात नागिनीच्या झुडुपात दोन मोठ्या निळ्या प्लास्टिक टाक्यांमध्ये सुमारे ३०० लिटर कच्चे रसायन आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी अर्जुन पवार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला.
सदर कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे १०,५०० रुपयांचे कच्चे रसायन जप्त करून त्यातील नमुना तपासणीसाठी घेतला व उर्वरित रसायन पंचांसमक्ष नष्ट केले. तसेच वापरलेल्या प्लास्टिक टाक्यांचाही नाश करण्यात आला.
या प्रकरणी अर्जुन लक्ष्मण पवार (रा. जुनोने, ता. चाळीसगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हीजन अॅक्ट कलम ६५ (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
