अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने कडक पवित्रा घेतला असून मागील दोन दिवसांत धडक कारवाई करत २ डंपर व २ ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आल्या. ही कारवाई तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत पार पडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील विविध भागांतून अवैधरीत्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर पथकाने सापळा रचून संबंधित अनेक ठिकाणी अचानक धाड टाकली. यावेळी काही वाहनांमधून परवानगीशिवाय वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार कारवाई करत २ डंपर व २ ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात घेण्यात आल्या.
जप्त करण्यात आलेली वाहने संबंधित महसूल कार्यालयात जमा करण्यात आली असून त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या इतरांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे.
तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले की, शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही. अशा कारवाया नियमितपणे सुरू राहणार असून महसूल विभागाकडून कडक नजर ठेवली जात आहे. नागरिकांनी देखील अशा प्रकारांची माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाच्या या पवित्र्याचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
