Oplus_16908288
अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील बोरखेडे जवळील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा पाय घसरून पाण्यात पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेमुळे चाळीसगाव शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पाच युवक बोरखेडे परिसरातील धरणात पोहण्यासाठी गेले होते. दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास मोईन जाकीर झारेकरी (वय २०) याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. धरणातील खोल पाणी व गाळात अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव परिसरातील काही नगरसेवक, समाजसेवक तसेच चाळीसगाव शहरातील युवकांनी घटनास्थळी धाव घेत पार्थिव बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. जवळपास तीन तासांच्या प्रयत्नानंतर संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास मोईनचे पार्थिव धरणातून बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरताच ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मोईन हा मालेगाव येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही शिक्षणाच्या जोरावर कुटुंबाला आधार देण्याचे त्याचे स्वप्न होते. मात्र काळाने त्याच्यावर अकाली घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
या वेळी त्याच्यासोबत शेख मुनीब मोहम्मद सलीम (वय २०, सडक गल्ली चाळीसगाव), रेहान सय्यद (वय २०, रथ गल्ली चाळीसगाव), अल्तमाश शेख (वय २४, प्लॉट एरिया चाळीसगाव) आणि जायद शेख (सदानंद हॉटेल समोर, चाळीसगाव) हे युवक उपस्थित होते. मोईनच्या निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोक व्यक्त केला जात असून “डॉक्टर होऊन कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करणारा मुलगा काळाने हिरावला,” अशा भावना व्यक्त होत आहेत.
