अधिकार आमचा न्युज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
जळगाव( प्रतिनिधी)-एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत घरकाम करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराला अटक करून तब्बल ४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
मेहरूण तलाव परिसरातील लेकसाईड रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या सौ. सुधा प्रभुनाथ कावरा यांच्या घरातून तसेच समोर राहणाऱ्या तेजल पियुष संचेती यांच्या घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना १२ जून २०२६ रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला तात्काळ तपासाचे आदेश दिले. गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिर्यादींच्या घरी काम करणाऱ्या महिलेने साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार समताबाई धर्मराज धांडेकर (रा. रमेश्वर कॉलनी, जळगाव) हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने धर्मराज हरिसिंग मीना (रा. विदिशा, मध्यप्रदेश) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी धर्मराज मीनाला अटक केली.
आरोपींकडून २३.१० ग्रॅम वजनाचा सुमारे ३.०९ लाख रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस तसेच ९.६४ ग्रॅम वजनाची सुमारे ९१ हजार रुपये किमतीची सोन्याची कानातल्यांची जोडी असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील गिरीश पाटील, किरण चौधरी, प्रमोद लांडवंजारी, विशाल कोळी, सुभाष साबळे आणि योगेश घुगे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
