अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरासह तालुक्यातील अनेक गावांतील सामान्य कुटुंबातील महिलांना प्रसूतीसाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात यावे लागते. मात्र, या रुग्णालयाकडे जाणारा मुख्य रस्ता अनेक दिवसांपासून अंधारात बुडालेला आहे. कारण, रस्त्यावरील वीज दिवे बंद असून त्यामुळे रात्रीच्या वेळी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः रात्रीच्या सुमारास आपत्कालीन सेवा किंवा प्रसूतिसाठी येणाऱ्या महिलांना, तसेच वृद्ध रुग्णांना अंधारात चालणे अत्यंत जीवघेणे ठरत आहे. रुग्णालयात पोहोचण्याआधीच या रस्त्यावर त्यांची दमछाक होते.
अंधाराचा फायदा घेत परिसरात कुत्र्यांचा संचारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पायी चालणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, अनेक वेळा लहान मुलं व महिलांना कुत्र्यांपासून स्वतःचा बचाव करत रुग्णालयात पोहोचावे लागते.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येत असून, “मुख्य रस्त्यावरील लाईट तात्काळ सुरू करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी,” अशी जोरदार मागणी सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.
