अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ‘दामिनी पथक’ कार्यरत झाले आहे.या पथकाने आज सहा टवाळखोरांवर कारवाई केली आहे. शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात होणाऱ्या टवाळखोरीला आळा घालण्यासाठी हे पथक दररोज नियमितपणे गस्त घालणार असून संशयितांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
दामिनी पथकाने विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी शाळा आणि कॉलेज परिसरात टवाळखोर व उपद्रवी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कडक नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी शाळा-कॉलेज सुटण्याच्या वेळेस पथकाचे अधिकारी व महिला कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कुठलीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थिनींच्या या पथकामुळे विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून,पालक वर्गातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.
टवाळखोरांवर कारवाई होणार
शाळा, महाविद्यालय परिसरात पथक गस्त घालत राहणार असून गस्त नियमित सुरू राहणार आहे. दामिनी पथकातील महिला कर्मचारी पोलीस दीदी म्हणून विद्यार्थिनींशी संवाद साधून पोलिसांप्रती भीती कमी करण्याचा प्रयत्न करणार.तसेच टवाळखोरांचा शोध घेऊन त्यांना लगाम घालण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी दिली आहे.
दामिनी पथक केले सुरू
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पाऊल उचलले आहे.पोलीस ठाण्यातील १ अधिकारी २ महिला आणि २ पुरुष यांचे दामिनी पथक नेमले आहे. दररोज शाळा भरण्याच्या वेळी आणि शाळा सुटताना हे पथक हद्दीतील शाळा आणि महाविद्यालय परिसरात गस्त घालणार आहे.
