अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – आज दिनांक १४ जुलै २०२५ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने वाघळी (ता. चाळीसगाव) येथील शेठ कुंदनमल इंदरचंद राखा माध्यमिक विद्यालय व पी.डी. सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व व्यसनमुक्तीबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या उपक्रमात दोन्ही शाळांतील सुमारे ५०० विद्यार्थी-विद्यार्थिनी, मुख्याध्यापक शेखर देशमुख, मुख्याध्यापक किशोर कदम तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते. ग्रामीण पोलिस प्रशासनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी विद्यार्थ्यांना ‘गुड टच – बॅड टच’, वाहतूक नियमांचे पालन, व्यसनांचे दुष्परिणाम आणि नवीन कायद्यांची माहिती याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमात विशेषतः मुलींच्या अपहरणप्रसंगी दाखल होणारे गुन्हे, त्याचे कायदेशीर परिणाम, तसेच किशोरवयीन मुलांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधीनता आणि त्याचे गंभीर परिणाम यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सजग नागरिक म्हणून सुरक्षिततेची जाणीव निर्माण होणे, तसेच वाट चुकू न देता शिस्तबद्ध जीवनाकडे वाटचाल होणे, हा उद्देश सफल झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
