अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी)- चाळीसगाव भडगाव रोडवरील युनियन बँकेच्या एटीएम केंद्रात मोठा सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. एटीएममध्ये कार्ड अडकवून हेल्पलाईनच्या नावाखाली ग्राहकांकडून पिन मागवून लाखो रुपये लांबविण्यात आले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली असून, पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा
शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा व व्यसनमुक्तीविषयक जनजागृती कार्यक्रम
मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3 वाजता ज्ञानेश्वर मधुकर पवार हे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले.मात्र कार्ड अडकले. मशीनवर लावलेल्या हेल्पलाईन नंबरवर फोन केला असता पिन टाकायला सांगण्यात आलं. काही वेळातच त्यांच्या खात्यातून 42 हजार रुपये उडवले गेले! हेच प्रकार इतर ग्राहकांबाबतही घडले संभाजी भावराव पाटील – ₹1,13,000,संभाजी पतिगराव पाटील – ₹30,000,गणेश रवींद्र पाटील – ₹17,000,नितेश अशोक पाटील – ₹5,000 यांची देखील फसवणूक झाली आहे.
रविवार असल्याने तक्रारी करण्यात ग्राहक असमर्थ ठरले, मात्र सोमवारी सकाळी सर्व ग्राहकांनी बँकेत धाव घेतली. बँक मॅनेजर पुंड यांना प्रकार सांगितल्यानंतर लगेच पोलीस ठाण्यात कळवण्यात आलं. मात्र पोलीस येण्याआधीच एटीएम मशीन उघडण्यात आली आणि एकही अडकलेलं कार्ड मिळालं नाही!
शहर पोलिस ठाण्यात फसवेगिरी करणाऱ्या अनोळखी वर भारतीय न्याय संहिता कलम 318(4),माहिती तंत्रज्ञान अधिनियम 66(सी),66(डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून, युनियन बँकेच्या एटीएम च्या सीसीटीव्ही फुटेज द्वारे तपास लागण्याची शक्यता आहे.
सायबर टोळी सक्रिय?
हा प्रकार पूर्वनियोजित फसवणूक असु शकतो,कार्ड स्कीमिंग किंवा फेक हेल्पलाईनद्वारे OTP/पिन मिळवून पैशांची लूट केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
शहर पोलिसांचे आवाहन
आपल्या बँक अकाउंट,डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड संबंधित असलेली माहिती जसे कार्ड नंबर,ओटीपी,सी वी वी नंबर तसेच इतर गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये व फसवणुकी पासून सावध रहावे असे आवाहन शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी केले आहे.
