अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- दि. 14 जुलै 2025 शाळकरी विद्यार्थ्यांसोबतच पालकांमध्येही कायदेशीर व सामाजिक बाबतीत जागृती निर्माण होणे अत्यावश्यक असल्याने, चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर म. मुटेकर यांनी मौजे अंधारी तांडा येथे गावभेटीदरम्यान पालकांसाठी विशेष माहिती सत्राचे आयोजन केले.
सायंकाळच्या सत्रात गावातील नागरिकांशी संवाद साधताना मुटेकर यांनी दारूबंदीचे महत्त्व, मुलांचे संरक्षण, व्यसनमुक्तीचे फायदे आणि कुटुंबातील संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी नव्याने लागू झालेल्या भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), भारतीय साक्ष अधिनियम (BSA) याबाबत सविस्तर माहिती दिली.
विशेषतः पॉक्सो कायदा आणि अल्पवयीन मुलींच्या मिसिंग प्रकरणांबाबत उपस्थितांना जागरूक करण्यात आले. पोलिसांत नोंदवल्या जाणाऱ्या गुन्ह्यांचे कायदेशीर दृष्टीकोन, गुन्ह्यांचे गंभीर परिणाम आणि सामाजिक स्तरावर निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत स्पष्टपणे मार्गदर्शन करण्यात आले.
अल्पवयीन वयात मुलांचे विवाह होऊ नयेत, तसेच पालकांनी आपल्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण आणि समंजस वर्तन ठेवावे, याबाबतही विशेष आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, आणि शंकर मुटेकर यांचे सखोल व प्रभावी मार्गदर्शन लाभले. यावेळी ग्रामस्थांनी देखील आपल्या अडचणी व शंका मांडत पोलिसांशी थेट संवाद साधला.
