अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार शेख (मलिक)
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव (प्रतिनिधी) – शेवरी (ता. चाळीसगाव) येथून चोरीला गेलेल्या मोटारसायकल प्रकरणाचा छडा लावत चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या कडून एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
२४ जुलै २०२५ रोजी रमेश उखा राठोड (वय ४०, व्यवसाय – मजुरी, रा. शेवरी, ता. चाळीसगाव) यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्यांच्या घरासमोरून २३ जुलै रोजी रात्री ८ ते २४ जुलै रोजी पहाटे २ वाजेच्या दरम्यान त्यांच्या मालकीची ४० हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची, पांढऱ्या पट्ट्यांची बजाज प्लॅटीना मोटारसायकल (क्र. MH19 CB 5502) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यावरून भाग ५ गु.नं. २४०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंचायत समितीच्या मुतारीच्या भिंतीवर मद्याच्या बाटल्या; प्रशासनाचे दुर्लक्ष
या गुन्ह्याचा तपास करत असताना मा. पोलीस अधीक्षक श्री. माहेश्वरी रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या सूचनेप्रमाणे आणि पोलीस निरीक्षक शंकर महादेव मुटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोधपथकाने कार्यवाही सुरू केली. यावेळी शेवरी गावातील पोलीस पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.
तपासात त्यांनी आपली नावे १) शिवाजी बाळू मेटकर (वय २३) आणि २) पुष्पक अशोक भालेराव (वय २३, दोघेही रा. तळेगाव, ता. चाळीसगाव) अशी सांगितली. सखोल चौकशीत त्यांनी करजगाव येथून मोटारसायकल आणि मोबाईल चोरी केल्याची तसेच शेवरी येथूनही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली आणि एक मोबाईल असा एकूण ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक शंकर महादेव मुटेकर यांच्या नेतृत्वाखाली सफौ. युवराज नाईक, पोहेकॉ. संदीप पाटील, पोना. तुकाराम चव्हाण, पोकॉ विजय पाटील आणि मनोज चव्हाण यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस नाईक तुकाराम चव्हाण करीत आहेत.
